महत्त्वाचे

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मिस्टर इंडिया अधिकारी; फक्त पैसेवाल्यांसाठीच हजेरी.सामान्य नागरिक त्रस्त


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मिस्टर इंडिया अधिकारी; फक्त पैसेवाल्यांसाठीच हजेरी.सामान्य नागरिक त्रस्त

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे’ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नगरपरिषदेमधील अनेक अधिकारी हे सामान्य नागरिकांसाठी मिस्टर इंडिया(गायब होणारे ठराविक मंडळींना दर्शन देणारे )ठरत असून फक्त ठरावीक पैसेवाल्या आणि प्रभावशाली लोकांच्या कामासाठीच कार्यालयात दर्शन देत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. त्यामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस उडत चालला आहे.

नगरपरिषदेमध्ये दररोज जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर, बांधकाम परवाने, पाणीपुरवठा, विविध दाखले तसेच नागरी सुविधा यांसंदर्भातील कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे अधिकारी कार्यालयात नसतानाही त्यांच्या अनुपस्थितीची कोणतीही अधिकृत नोंद हालचाल रजिस्टरमध्ये आढळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

काही संतप्त नागरिकांनी आरोप केला की, सामान्य माणूस दिवसभर चकरा मारत राहतो, मात्र दलाल किंवा आर्थिक ताकद असलेल्या लोकांची कामे काही मिनिटांत पूर्ण होतात. त्यामुळे नगरपरिषद ही जनतेसाठी की ठरावीक लोकांसाठी?असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

नगरपरिषदेतील काही कर्मचाऱ्यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिली. साहेब कुठे गेले, कधी येणार, याची माहिती आम्हालादेखील दिली जात नाही. फोन केले तरी प्रतिसाद मिळत नाही, अशी कबुली काही कर्मचाऱ्यांनी दिली. परिणामी नागरिक आणि कनिष्ठ कर्मचारी दोघेही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काही वेळा मुख्याधिकारीदेखील कार्यालयात उपलब्ध नसल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात रंगली आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याची किंवा अनुपस्थितीची अधिकृत नोंद नसल्याने प्रशासनातील जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हालचाल नोंदी गायब असल्यामुळे अधिकारी नेमके कुठे आणि कोणत्या कामासाठी जातात, याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नगरपरिषदेतील या कथित अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून हालचाल रजिस्टरची तपासणी करण्यात यावी, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रशासनात तातडीने शिस्त आणावी, अशी जोरदार मागणी आता तळेगावातील नागरिकांतून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *