मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० अशा एकूण १५ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत तालुक्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालामुळे मावळच्या राजकीय पटावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा एकहाती फडकताना दिसत आहे.
ही निवडणूक केवळ आकड्यांची लढाई न ठरता नेतृत्व, विश्वास आणि विकासदृष्टी यांची जनतेने घेतलेली कसोटी होती. या कसोटीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले, असेच चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. संघटनात्मक बांधणी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि ‘काम बोलेल’ या विकासमंत्रावर आधारित राजकारण याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा लाभ झाला.
निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सुनील शेळके म्हणाले मावळ तालुक्यातील जनतेने दिलेला हा कौल माझ्या अजित दादांना अर्पण केलेली भावनिक श्रद्धांजली आहे. त्यांनी मावळसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी जनतेने आमच्यावर टाकली आहे. हा विजय व्यक्तीचा नसून विकासविचारांचा आहे.त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
गेल्या काही वर्षांत तालुक्यात राबविण्यात आलेली रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांची विकासयात्रा मतदारांच्या लक्षात ठळकपणे राहिली. शहरी भागाबरोबरच दुर्गम ग्रामीण व आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचलेली विकासधारा, अडचणीच्या काळात तत्काळ मदतीसाठी उभे राहणारे नेतृत्व आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया हे या विजयाचे प्रमुख सूत्र ठरले.
विशेष म्हणजे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे कौल दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून दिसून आले. महिलांसाठी राबविलेल्या सक्षमीकरण योजना, युवकांसाठी रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी आणि ज्येष्ठांसाठी सामाजिक सुरक्षेच्या उपक्रमांनी मतदारांचा विश्वास अधिक घट्ट केला.
राजकीय अभ्यासकांच्या मते, हा निकाल म्हणजे मावळ तालुक्यातील बदलत्या राजकीय मानसिकतेचे द्योतक आहे. घोषणाबाजीपेक्षा कामगिरीला प्राधान्य देणारी जनता, नेतृत्वावर विश्वास ठेवणारी संघटनशक्ती आणि भावनिक नात्यांपेक्षा विकासनिष्ठ राजकारणाकडे झुकणारा कल या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आला.
या विजयामुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक भक्कम झाले असून हा निकाल केवळ राजकीय यश न राहता अजित दादांच्या विचारांना मिळालेली लोकमान्यता आणि सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला विश्वासाचा शिक्का असल्याचे चित्र मावळमध्ये स्पष्टपणे उमटले आहे.





