सामाजिक

तळेगाव दाभाडे ची कन्या डाॅ अश्विनी राव यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर :समाजसेवेतून उभा केला मानाचा झेंडा


तळेगाव दाभाडे ची कन्या डाॅ अश्विनी राव यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर :समाजसेवेतून उभा केला मानाचा झेंडा

तळेगाव दाभाडे :

१ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार–२०२६ सोहळ्याची रंगत यंदा विशेष ठरणार आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे ची कन्या डॉ सौ. अश्विनी विकास राव( चव्हाण) यांची निवड झाल्याने परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

मानसिक आरोग्य आणि समाजसेवा या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करत असलेल्या अश्विनी राव यांनी अनेक गरजू, निराधार व मानसिक तणावग्रस्त व्यक्तींना आधार देत समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन विजेता मिडीया, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे. नवी पेठ, पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉल पत्रकार भवन शेजारी गांजवे चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पुरस्कारप्राप्तीबद्दल अश्विनी राव यांना निमंत्रण पत्राद्वारे सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.

तळेगाव दाभाडेच्या मातीतून घडलेली ही कन्या आज राज्यभरात आपले वेगळे स्थान निर्माण करत असून, तिच्या यशामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे. सेवेच्या माध्यमातून समाज बदलू शकतो हा संदेश देणाऱ्या अश्विनी राव यांचा हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *